Wednesday, December 11, 2013
Love Birds | लव्ह बर्ड्स
कुठेतरी पुस्तकात वाचलं की लव्हबर्डची जोडी घरात असेल तर आपल्यावर प्रेम करणारं कोणी तरी आयुष्यात येत..असलेलं प्रेम वाढत.म्हणुन मोठया आवडीने लव्हबर्डची जोडी घरात आणली.एक दिमाखदार पिंजराही घेतला त्यांच्यासाठी..सजलेला सुंदर पिंजरा.
रंगीबेरंगी सुंदर चिमुकले जीव,रंगीत कापसाला चिमुकली चोच,दोन पाय,दोन डोळे लावून बनवलेले शोपीसच जणु.घरी येणारे जाणारे आवर्जुन पाहायचे."किती छान दिसतात",म्हणून कौतुक करायचे.सकाळी सकाळी जाग यायची, ती सुद्धा त्यांच्या चिवचिवाटाने.खुपछान वाटायचे.घरात कोणी नसले तरी चिवचिवाट करुन,घर डोक्यावर घ्यायचे.ते सोबत असले कि घरच जिवंत व्ह्ययचे.त्यांच्यामुळॆ आयुष्यात प्रेम आली की नाही,ते नाही माहीत,पण चैतन्य,जिवंतपणानक्कीच आला होता.कोणी बोलायला नसले की त्यांच्या सोबत गप्पा मारण्यात वेळ कसा जायचा,ते कळायचे सुद्धा नाही.
दिवस असेच जात होते, लव्हबर्ड आता अगदी आयुष्याचा भाग झाले होते.एक दिवस अचानक मला असं जाणवलं की एका लव्हबर्डच्या हालचाली थोडया मंदावल्या आहेत.माणसांचे एक बरे आहे,काही दुखले खुपले की तोंडाने सांगू तरी शकतात.हे मुके जीव ते कसे सांगणार.शेवटी मीच ठरवलं,त्या लवबर्डला घेवून प्राण्यांच्या डॉक्टर कडे जायचे. मित्राला म्हणालो,"चल माझ्या सोबत,या लव्हबर्डला घेवून डॉक्टर कडे जावू. तर तो म्हणाला,"वेडा आहेस का तू?,७५ रुपयाला दुसरा मिळतो, मेला की दुसरा आण."
मी: अरे भावनाना असे पैशाने कसे तोलतोस??.मी लव्हबर्डना पाळले आहे,तर त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे.पैशाने दुसरा मिळेल,पण तोच मिळेल का??." या वर तो निरुत्तर झाला.
मग मी त्या लव्हबर्डला डॉक्टर कडे घेवून गेलो.डॉक्टरने सांगितले,"याला एक विषाणूजन्य आजार झाला आहे,हा जास्त वेळ नाही काढू शकणार.तरी ही औषध लिहून देतो,ती वेळेवर डॉपने पाज."
औषधाची चिठ्ठी घेवून केमिस्ट कडे गेलो.तो म्हणाला,"घरात कोणी लहान मुलं आजारी आहे का?."
मी:"नाही,लव्हबर्ड आजारी आहे माझा."
तो :"अहो,पण त्याच्या किंमतीच्या मानाने,ही औषध महाग आहेत.
मी यावर काहीच बोललो नाही.
घरी आलो,डॉपरने त्या लव्हबर्डला औषधाचे थेंब पाजले. माहीत होते मला की तो वाचणार नाही,तरी त्याला जगवायचा माझा प्रयत्न सुरुच होता."रात्री झोपण्याच्या आधी त्यांच्या पिजऱ्याकडे लक्ष गेले,तर तो लव्हबर्ड पिंजऱ्याच्या एका कोपऱ्या मध्ये शांत बसला होता.त्याच्या शरीराची होणारी थरथर दुरुनच जाणवत होती माझ्या डोळयाना.
दिवे बंद केले आणि झोपलो.रात्री एकचा सुमार असेल,विचित्र चिवचिवाट व पंखांच्या फडफडीचा आवाज आला. तसाचं डोळे चोळत उठलो.दिवे लावले,पाहिले तर तो लव्हबर्ड जीवाच्या आकांताने इकडेतिकडे धडपडत होता,फडफडत होता. त्याचा जोडीदार,त्याची ती अवस्था पाहून,आर्त चिवचिवाट करत होता.
मी लगेच पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि त्या लव्हबर्डला अलगद हातामध्ये घेतले. माझ्या तळहातावर सुद्धा त्याची ती असहाय्य धडपड सुरु होती.३-४ क्षणंच झाले असतील फक्त,त्याच्या पंखाची गती मंदावली,पाय वाकडे झाले,त्याने मान टाकली,डोळ्यातूनप्राण गेला त्याचा.......त्याचा तो निर्जीव देह,मी तळहातावर तसाच ठेवला होता....डोळ्यातून कधी नव्हे ते पाणी ओघळले माझ्या...कधी ते मला सुद्धा कळले नाही.
त्यानंतर नवीन लव्हबर्ड घ्यायची हिंमत नाही झाली.असे नाही की खिश्या मध्ये ७५ रुपये नव्हते.
पुस्तकात तर लिहिले होते, लव्हबर्डची जोडी घरात आणली की आयुष्यात प्रेम येते,पण इथे तर हा पक्षी आपल्या आयुष्यातून कोणी गेले की काय वाटते,ते शिकवून गेला.
©प्रशांत दा. रेडकर.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment