Friday, August 17, 2012

बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Polyachya shubhechha

श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.'
पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचाआजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊनत्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंगलावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशानाना तर्‍हेने सजविण्यात येते.
शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्‍नीक वाजत गाजतजातात व त्याला 'अतिथी देवोभवो' प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या रोजी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते.शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते.
महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेचशर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फेझूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यांनतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते.अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला जातो.
याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवासकरून सायंकाळी स्नान करतात. चौसष्टयोगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात.घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ' अतित कोण ?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

No comments: